Showing posts with label Indian flag. Show all posts
Showing posts with label Indian flag. Show all posts

Tuesday, 20 August 2013

व्हॉट्सअॅपवर ‘तिरंगा’ का नाही? एक नवा ट्रेण्ड

हाय गुड मॉर्निंग, व्हॉट्सअॅप ब्रो?... व्हॉट्सअॅपवर हा नित्यनेमाने फिरणारा मेसेज. पण गेल्या काही दिवसांपासून या अॅपवर आणखी एक मेसेज फिरत होता तो म्हणजे... 'व्हॉट्सअॅपवर भारताचा झेंडा का नाही? हा प्रश्न फॉर्वर्ड करत रहा... व्हॉट्सअॅपचे प्रशासन जागे होईपर्यंत स्वस्थ बसू नका. १५ ऑगस्टपर्यंत भारताचा झेंडा व्हॅट्सअॅपवर आलाच पाहिजे.' आणि आज १५ ऑगस्ट निघून गेल्यानंतर अझूनही तो मेसेज असाच फिरत आहे.

भारताचा तिरंगा ध्वज व्हॉट्सअॅपवर आणण्यासाठी व्हॉट्सअॅप युझर्सनी हे कुजबुज आंदोलन सुरू केले असून सर्व भारतीयांना एकजुटीचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन त्यातील स्टिकर्ससाठी प्रसिद्ध आहे. एखादा संदेश पाठविताना त्याबरोबर त्याला पूरक असलेला स्टिकर पाठवता येतो. स्टिकर्स म्हणजे स्मायली नसुन त्यामध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत या स्टिकर्समध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, चीन, जपान, कोरिया व स्पेन या दहा देशाच्या ध्वजांचे स्टिकर्सही आहेत. मात्र, कोट्यावधी युझर्स असलेल्या भारताच्या ध्वजाचा स्टिकर या अॅपमध्ये नाही. त्यामुळे भारतीय व्हॉट्सअॅप युझर्समध्ये प्रचंड नाराजी आहे.

इतर देशांप्रमाणेच भारतीय ध्वजही व्हॉट्सअॅपवर सन्मानाने फडकावा, यासाठी आता कोण्या एकाच्या डोक्यात आलेली कल्पना आता भारतीय अॅप युझर्सनी उचलून धरली आहे. त्याचाच भाग म्हणून 'मेसेज मोहीम' सुरू करण्यात आली आहे. ही मोहिम कोठून सुरु झाली हे पक्के सांगता येणार नाही मात्र अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत हा मेसेज सर्वच ग्रुपमध्ये पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या इनबॉक्समध्ये भारताचा झेंडा व्हॉट्सअॅपवर असावा असा एक तरी मेसेज आजही पडत आहे. काहींनी तर या मोहिमेच्या समर्थनार्थ फेसबुकवरही काही ग्रुप आणि पेजेस सुरू केली आहेत.

भारतीय कायद्यानुसार भारताचा झेंडा वापरण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, व्हॉट्सअॅपला कोट्यवधी मिळवून देणाऱ्या भारतासाठी व्हॉट्सअॅप साधी एक परवानगी घेऊ शकत नाही का, असा सवाल काही युझर्सनी फेसबुक पेजेसवर उपस्थित  केला आहे. तर काहींच्या मते झेंडा व्हॉट्सअॅपवर आणणे ही तांत्रिक बाब असून त्याचा इतका बाऊ करु नये असे मत व्यक्त केले आहे.


काहीही असो मात्र लोकांना भारतीय झेंडा व्हॅट्सअॅपवर का हवा आहे याचे ठोस कारण देता येत नाही. तरी अनेकांना हा झेंडा व्हॉट्सअॅपवर हवा आहे. या मोहिमेचे पुढे काय होईल हा मेसेज थेट आता २६ जानेवारीच्या आसपास दिसून येईल असे सध्या चित्र आहे. मात्र तुम्हाला या ट्रेण्डबद्दल काय वाटते प्रतिक्रीया देऊन नक्की कळवा.